रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरा लगतचा परिसर सील केल्याचा अजब प्रकार सिडको एन ७ बजरंग कॉलनीत घडला. विरोध केल्यानंतर नागरिकांनाच गुन्हे दाखल केल्याची करण्याची धमकी कंत्राटदाराने दिली. निव्वळ खाबूगिरी करण्यासाठी तीन पत्रे ठोकून अन येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा सोडणाऱ्या कंत्राटदाराला जाब विचारणार कोण ? असा प्रश्न आहे. आयुक्त साहेब, नेमकं इथेच घोडं पेंड खातं !
कोरोना महामारीतही भ्रष्टाचारी किडे वळवळत आहेत.एखाद्या भागात रुग्ण आढळला तेव्हापासून ते रुग्णाला सुट्टी देण्यापर्यंतच्या काळात प्रशासनाला करावयाच्या कामाची नियमावली आहे. त्यानुसार रुग्ण आढळला की तातडीने परिसर सील करणे व संपर्कातील लोकांचे स्वॅब घेणे असा नियम आहे. सिडको एन-७ बजरंग कॉलनीत घडले ते वेगळेच !
घटना अशी...
साधारणत: वीस दिवसांपूर्वी बजाज कंपनीतील कर्मचार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कंपनीने त्यापूर्वीच सदर कर्मचाऱ्याला वाळूज भागात राहण्याची सोय करून दिली होती. त्यामुळे त्याचे येणे-जाणे नव्हते. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात तर बजरंग कॉलनी सिडको एन-७ भागात राहणाऱ्या कुटुंबाला घरातच क्वारान्टीन करण्यात आले. तिकडे सदर कर्मचाऱ्यावर उपचार झाले आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. चौदा दिवसांचा कालावधी लोटला होता. इकडे घरी असलेले त्याचे आई-वडील, पत्नी आणि एका मुलाचे स्वब घेण्यात आले. त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला.
अन कंत्राटदाराला आली जाग !
दरम्यान तब्बल २० दिवसानंतर परिसर सील करणाऱ्या कंत्राटदाराला जाग आली. ३ जुलै रोजी कंत्राटदाराने पत्रे आणि बल्ल्यांचा लवाजमा आणला आणि परिसर सील करायला लागला. आजूबाजूच्या लोकांनी कंत्राटदाराला समजावून सांगितले. सदर कर्मचारी निगेटिव्ह आला आहे. घरातल्या कुणालाच लक्षणे नाहीत. त्या कर्मचाऱ्यांचा परिसराशी संपर्कही आलेला नाही. तरीही कंत्राटदार जुमानेनाच. नागरिकांची गर्दी वाढली तसे कंत्राटदाराने फर्मान सोडले... कामात अडथळा आणला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू ! कंत्राटदाराच्या या धमकीने नागरिक निघून गेले.
खाबूगिरीसाठीच सील !
दरम्यान कंत्राटदाराने परिसर सील करण्याच्या नावाखाली निव्वळ खाबुगिरी केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.केवळ ३ पत्रे अन ५ बल्ल्या ठोकल्या. विशेष म्हणजे लोक ये जा करतील अशी जागा मोकळीच सोडली आहे. परिसर सील करण्याचे कंत्राटदाराला ८ ते १० हजार मिळतात. तीन पत्रे आणि चार-पाच बदल्या ठोकून कंत्राटदार मोकळा झाला. आता मनपाकडून हजार रुपयांचे बिल तो वसूल करेल !












